पावसा अभावी पिकाची राख रांगोळी,अन् इकड शासन आपल्या दारी!!
शेतकऱ्यांची चिंता वाढली !
रोखठोक न्युज वार्ताहर
गौतम बचुटे/केज :- अर्ध्या पेक्षा जास्त पावसाळा संपत आला तरी पासून पडलेला नसून जेमतेम पावसावर तग धरून असलेली पिके आता माना टाकायला लागली आहेत. तर हलक्या जमितीतील पिके करपायला लागली आहेत.
केज तालुक्यातील १३५ गाव आणि वाड्या-वस्त्या मिळून १ लाख १४ हजार ८४६ हेक्टर जमिनीचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. केज तालुक्यातील केज, होळ, युसुफवडगाव, बनसारोळा, हनुमंत पिंपरी, नांदूरघाट, चिंचोली माळी, विडा, मस्साजोग या सर्व महसूल मंडळात एकूण क्षेत्रा पैकी १ लाख ५ हजार ११२ हेक्टर क्षेत्र हे खरीपासाठी पेरणी योग्य क्षेत्र आहे.
या वर्षी १ लाख ५ हजार ११३ हेक्टर क्षेत्रा पैकी सर्वात जास्त ७७ हजार २६९ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रा पैकी ७३.५१% एवढ्या क्षेत्रावर निव्वळ सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे.
सुमारे महिना होत आला तरी पाऊस न पडल्याने सोयाबीनचे पिके ही फुलांच्या ऐन बहरात असताना आणि काही ठिकाणी कोवळ्या शेंगा लागायला सुरुवात झाली असताना पावसाने उघडीप दिल्याने पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे आता सर्वच पिकांची माना टाकल्याने शेतकरी वर्ग प्रचंड मानसिक दडपणाखाली असून चिंताग्रस्त झालेला आहे. आता पेरणीसाठी केलेला सर्व खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी अडचणीत आल्याने मजूर वर्ग देखील संकटात आहे. आता शासनाने शेतकरी वर्गाला आणि मजूर वर्गाला देखील मदत करण्याची आवश्यकता आहे.अश्यात महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येतोय पण यात दुष्काळा वर पावसावर या आलेल्या संकटा वर एक ही राज्यकर्ता बोलताना दिसत नाही.
——————————————————————
शेतकऱ्यांना हेकटरी ६० हजार रु नुकसान भरपाई द्या
पावसामुळे सर्वत्र चारा पाण्याची गंभीर परिस्थिती उदभवण्याची शक्यता असून उसाचा वापर चाऱ्यासाठी उसाचा वापर झाल्यास पशुधन, साखर कारखाने आणि मजूर वर्ग अडचणीत येऊ शकतो. सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रु. मदत देऊन पीक कर्जाचे पुनर्गठन करावे आणि कर्ज माफीचा निर्णय घ्यावा.