• Fri. Apr 24th, 2026

पाऊस असा पडतो की,बैलाचे एक शिंग भिजते,दुसरे कोरडे. शेतकरी म्हणतात..मायबाप सरकार कसा साजरा करायचा पोळा? दुष्काळ जाहीर करा,पीकवीमा द्या,पीककर्ज माफ करा.

Bybaba maske

Sep 8, 2023

पाऊस असा पडतो की,बैलाचे एक शिंग भिजते,दुसरे कोरडे.

शेतकरी म्हणतात..मायबाप सरकार कसा साजरा करायचा पोळा? दुष्काळ जाहीर करा,पीकवीमा द्या,पीककर्ज माफ करा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊसदेखील झाला नाही. पाऊस असा पडतो की बैलाचे एक शिंग भिजते, दुसरे कोरडेच राहते. बांधाआड पाऊस खेळ खेळतो. उष्णता वाढल्याने पिकाचा सारा होरपळा झाला. आता आठ दिवसांवर आलेला पोळा साजरा कसा करायचा, या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना आधार द्यायचा तर भरलेला पीकविमा द्या, अनुदान द्या तसेच चालू हंगामात काढलेले पीककर्ज माफ करा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

तालुक्यात खरीप हंगामात ४८ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड, सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला. तूर, बाजरीदेखील पेरली. मूग आणि उडीद तर पहिल्या फेरीतच वाया गेले.

सध्या सोयाबीन फुलात व शेंगाच्या अवस्थेत असले तरी ओलीचा अभाव आणि उष्णतेच्या प्रभावामुळे फुलगळती होऊन झाडेथोटी झाली असून, होरपळली आहेत. बाजरीने अकाली कणसं बाहेर टाकली. कापसाचे पीकदेखील हाताबाहेर जात आहे. अशा परिस्थितीत हातात पैसा येणार कुठून आणि आठ दिवसांवर आलेला पोळा साजरा कसा करायचा.

मागील काही दिवसांमध्ये उष्णतावाढल्याने पिकांची स्थिती आणखी बिकट झाली आहे

 बैलांना हिरवा चारा आणायचा कोठून?

केलेल्या कष्टाची उतराई म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. एक दिवस कामाला सुट्टी दिली जाते, मात्र पाऊसच नसल्याने नद्या कोरड्याठाक आहेत. मग बैलाला अंघोळ घालायची कुठे, बकेटभर पाणी अंगावर टाकण्याची वेळ आली आहे. चारा वाळून गेला. त्यांना हिरवा चारा कुठून मिळणार, याशिवाय बैलांचा साजशृंगार कसा करणार हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.

नियम, अटी शिथिल करा; पण आधार द्या

पीक आले नाही तर पीककर्ज कसे भरायचे? विमा भरलेला आहे. विमा लागू करा, अनुदान द्या, मात्र शेतकऱ्यांना दुष्काळसदृश स्थितीत आधार देण्याची खरी गरज आहे. नियम, अटी शिथिल करा, पण आधार द्या. वस्तुस्थिती पाहूनच तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!