केजसह तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन,रस्त्यावर टायर्स जाळून रस्ता आडवला.
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :-केज तालुक्यात केजसह अनेक ठिकाणी सुद्धा मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलने झाली.
दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव आक्रमक होत असून.दि. ७ सप्टेंबर रोजी केज तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलने पुकारण्यात आली होती. केज शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा तरुणांनी गुरुवारी दुपारी १२:०० वाजता अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले. तसेच केज बीड रोडवरील सावंतवाडी येथेही रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरकळंब-अंबाजोगाई या रस्त्यावर धनेगाव फाटा ता. केज येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने गुरूवारी सकाळी १०.३० वाजेपासून दुपारी १२.१५ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोनीजवळा येथील मराठा बांधवांनी आंदोलन केले. तर केज – युसुफवडगाव या ग्रामीण रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनास पाठींबा दिला.
या वेळी केज येथे तहसीलदार अभिजित जगताप यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तर धनेगाव फाटा येथे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
या आंदोलना दरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.