केज शहरातील नागरिक उरले केवळ टॅक्स भरण्या पुरते….!
नगरपंचायत ”जनविकासा” पासून कोसो दूर….!
रोखठोक न्युज वार्ताहर
शहरात मागच्या कांही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. नगरपंचायत झाल्यानंतर शहरातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आता ग्रामपंचायत होती तीच बरी होती अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली असून केज शहरातील रहिवासी हे केवळ टॅक्स भरण्यापूरतेच उरलेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केज शहराचा दिवसेंदिवस होणारा विस्तार पाहता शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून शहरवासीयांनी ग्रामपंचायतला नगरपंचायत चा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला आणि त्या संघर्षाचे फलित म्हणून ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले. मोठा जल्लोषही झाला आणि आता नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागणार नाही असे वाटत होते. मात्र कित्येक वर्षे झाले नगरपंचायत अस्तित्वात येऊनही कसल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा आणखीही केज मधील रहिवाशांना पाहायला मिळत नाहीत.केज शहरांमध्ये रस्ते, नाल्या आणि पाणी हे कित्येक वर्षांपासूनचे भेडसावणारे प्रश्न आहेत. मात्र या तिन्ही प्रश्नांपैकी अद्यापही एकाही प्रश्नांची उकल झालेली नाही. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत आहे, लोकसंख्या वाढत आहे, मात्र विस्तारित शहरांमध्ये अद्यापही नळ योजना पोहोचलेली नाही. प्रत्येक घरी बोअर घेणे शक्य नाही आणि घेतले तरी त्याला पाणी लागेलच आणि कायमस्वरूपी प्रश्न मिटेल असे नाही. त्यामुळे विस्तारित भागांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ज्या घरी बोअर आहेत त्या बोअरचे पाणी फेब्रुवारीमध्ये गेले असून नळ योजना नसल्याने पाण्यासाठी भटकंती तर करावी लागतेच परंतु भटकंती करून ही पाणी मिळत नसल्याने विकतच्या पाण्यावर रहिवाशांना गुजराण करावी लागत आहे. शेकडो टँकरचा पाण्याचा धंदा सुरू झाला असून मन मानेल तेवढ्या भावाने टँकर वाले पाणी विकतात. मात्र पर्याय नसल्याने रहिवाशांनी अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागते. विस्तारित भागातील रहिवाशांना चक्क सहा महिने पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे.
एवढेच नव्हे तर विस्तारित भागांमध्ये कित्येक ठिकाणी अंतर्गत रस्ते नाहीत. अंतर्गत रस्ते नसल्याने नाली बांधकाम झालेले नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या घराचे पाणी दुसऱ्याच्या घरा समोर जाऊन साठते आणि त्यामुळे कित्येकदा अगदी मारामारी पर्यंत सुद्धा भांडणे गेलेली आहेत. हे सर्व जनविकास करणारे उघड्या डोळ्याने पाहत असताना त्यांना जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे काहीही देणे घेणे राहिलेले नाही. निवडणुकीमध्ये मोठ-मोठी आश्वासने द्यायची आणि निवडून आल्यानंतर आणि सत्ता मिळवल्यानंतर त्या आश्वासनांना जाणीवपूर्वक बगल द्यायची एवढेच केजवासीयांच्या नशिबी आहे. त्यामुळे नगरपंचायत च्या माध्यमातून ज्या काही मूलभूत समस्या सोडवण्याचे काम करावे लागते त्याचा थोडा तरी विचार करून निवडणुकांमध्ये जे आश्वासने दिली होती आणि आमच्या शिवाय केजचा विकास कोणीच करू शकत नाही अशा वल्गना केल्या होत्या त्या कुठेतरी वास्तवात आणाव्यात एवढीच माफक अपेक्षा केज वासीयांची आहे. अन्यथा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.
