• Tue. Jun 23rd, 2026

महिला उपजिल्हाधिकारी अडकल्या अडीच कोटींच्या अपहारात

Bybaba maske

Feb 26, 2024

महिला उपजिल्हाधिकारी अडकल्या अडीच कोटींच्या अपहारात

रोखठोक न्युज वार्ताहर 

शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करताना झालेल्या 2 कोटी 64 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे परभणीच्या विद्यमान उपजिल्हाधिकारी व वर्ध्याच्या तत्कालीन भूसंपादक अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासन वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही सूर्यवंशी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती, परंतु उघडकीस आलेल्या घोटाळ्याची व्यापकता पाहता अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

महसूल विभाग आणि वर्धा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती सूर्यवंशी 17 फेब्रुवारी 2022 रोजी रुजू झाल्या होत्या. 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत लघुसिंचन कालवे प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जात असतो. त्याची जबाबदारी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांची असते. त्या पदावर असणाऱ्या स्वाती सूर्यवंशी यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच सूर्यवंशी यांच्या कार्यालयातील कागदपत्रे सील केली.

कार्यालयातील कागदपत्र सील केल्यानंतर या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली. यात काही शेतकऱ्यांच्या नावे 2 कोटी 13 लाख 311 रुपये बनावट कागदपत्रे सादर करीत काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत समुद्रपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वी वाटप झालेल्या 16 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रकरणही उघडकीस आले. कोशागार कार्यालयातील शासकीय खात्यातून 5 लोकांच्या नावे 50 लाख 85 हजार 424 रुपये दोन पतसंस्थेत खोटी खाती उघडून वळते केल्याचे दिसून आले. 25 वर्षांपूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे नाव निवाड्यात नव्हती. मोबदला मिळावा म्हणून ज्यांनी अर्जसुद्धा सादर केला नाही, अश्याही लोकांच्या नावाने पैसे उचलण्यात आलेत. खात्यात पैसे जमा करीत नंतर ते काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

वर्धेच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यावर पूर्वी काही प्रकरणात कारवाई झाली होती. अशा सर्व बाबी लक्षात घेता हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सध्या हे प्रकरण महसूल खात्यात चांगलेच खळबळ उडविणारे ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!