पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर घोषणा देणाऱ्या मराठा अंदोलकावर गुन्हे दाखल.
रोखठोक न्युज वार्ताहर
औरंगपूर (ता.केज) येथील संत तुकोबाराय पावनधाम या धार्मिक स्थळी तुकाराम बीज कार्यक्रमास आलेल्या बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गाडी समोर येऊन घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २४ जणांसह इतर २५ ते ३० जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या २७ मार्च रोजी केज दौऱ्यावर आल्या होत्या. त्या औरंगपूर शिवारातील संत तुकोबाराय पावनधाम या धार्मिक स्थळी तुकाराम बीज कार्यक्रमास दर्शनासाठी येत असल्याने व या ठिकाणी दरवर्षी परिसरातील १० ते १५ गावातील भाविक हजेरी लावत असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, दुपारी १ वाजता पंकजा मुंडे या दर्शन घेऊन परत जात असताना मंदीराच्या मेन गेटवर त्यांच्या गाडीचे समोर येऊन परिसरातील गावातील मराठा समाजाचे जमलेल्या ५० ते ६० लोकांनी अचानक मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाच अशा घोषणा दिल्या. या लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता.
दरम्यान, पोलिसांनी काढलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून नावाबाबत खात्री करीत डीएसबीचे योगेश समुद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिपक दिगांबर करपे, गणेश विठ्ठल करपे, शिवाजी ऊर्फ सतिष सुंदरराव करपे, संदीप अंकुश करपे, निलेश वसंत करपे, भैय्या संजय गायकवाड, अक्षय जनक करपे, अमोल श्रीराम करपे, अभिषेक अविनाश करपे, श्रीराम राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब राजाभाऊ मोरे, बालासाहेब बाबासाहेब रंदवे, प्रशांत शिवाजी करपे, विकास राजाभाऊ करपे, ओमकार दत्तात्रय करपे, राहुल श्रीराम करपे, विकास बाबुराव करपे, अमोल शिवाजी करपे (सर्व रा. जवळबन ता. केज), कैलास चव्हाण (रा. पळसखेडा ता. केज), मधुकर साखरे (रा. कानडी बदन ता. केज) योगेश संभाजी मस्के, सचिन मस्के (दोघे रा. सावळेश्वर ता. केज), गोविंद बालासाहेब गायकवाड, रवि गायकवाड (दोघे रा. आनंदगाव ता. केज) यांच्यासह इतर २५ ते ३० जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.
लाठीचार्जची चौकशी करून दोषींना निलंबित करा
पावधाम येथे तुकोबाराय मंदिरासमोर जमलेल्या मराठा तरुणांवर पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे २० ते २५ लोकांवर लाठीचार्ज करून अमानुषपणे काठीने झोडपले. यात ४ ते ५ जणांना जबर जखमा झाल्या आहेत. या एकतर्फी कारवाईचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमेशल मीना यांच्याकडे युसुफवडगाव ठाण्यात देण्यात आले आहे.
