‘वंचित’च्ये उमेदवार अशोक हिंगे यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा
सायबर ठाण्यात नोंद : विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप
रोखठोक न्युज वार्ताहर
लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य विरोधकांनी केल्याचा आरोप हिंगे यांनी केला असून, चौकशी करून कारवाईची त्यांनी केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. १८ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. काही पक्षांनी उमेदवारही जाहीर केले आहेत. याच निवडणुकीसाठी अशोक हिंगे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. ते सध्या प्रचारात असतानाच त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ तीन ते चार दिवसांपासून सोशल मीडियावर
व्हायरल झाला आहे. यात हिंगे हे डान्स करताना दिसत असून, बाजूला काही महिला आहेत. याच व्हिडीओखाली आक्षेपार्ह कॅप्शन देऊन हिंगे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फिर्यादीत ज्ञानेश्वर कवठेकर यांनी केला आहे. तक्रार देताना त्यांनी व्हिडीओसोबतच सोशल मीडियावरील पोस्टचे स्क्रीनशॉटही पोलिसांना दिले आहेत. सायबर पोलिसांकडून याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी अज्ञात चार लोकांविरोधात गुन्हा दाखल असून, यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
