महिला डॉक्टरला रूग्णाचा एकतर्फी प्रेमातून सतत त्रास.
ॲट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा, आरोपी अटकेत
रोखठोक न्युज वार्ताहर
पायाला बंदुकीतील गोळी लागल्यामुळे जखमी तरूण उपचारासाठी एका रूग्णालयात गेला, तिथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारही तिथेच सुरू ठेवले. दरम्यान उपचार देणार महिला डॉक्टरचा नंबर मिळवला. आणि तिला सतत त्रास देण्यास सुरूवात केली. वारंवार तिला अश्लिल मेसेज पाठवले, एवढ्यावर न थांबता रस्त्यातही तिला अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. सतीश बबनराव क्षीरसागर रा.लक्ष्मणनगर, बार्शी बीड असे या तरूणाचे नाव आहे. एका डॉक्टर तरूणीकडे पायाला गोळी लागल्याने सुरूवातीला सतीश क्षीरसागर उपचारासाठी गेला. त्यानंतर या तरूणीसह तिच्या कुटुंबियांना सतत फोनवरून त्रास द्यायला सुरूवात केली. तिचा रस्ता अडवून तिला मागील दोन वर्षांपासून सतत लग्नाची मागणी घालून तिचा पाठलाग करत होता. सदरील तरूण हा व्यसनी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या भीतीपोटी डॉक्टर तरूणीने
पोलिसांकडे तक्रार देखील केली नव्हती. परंतु बीड शहर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पीडितेसमोरच त्याला पोलीसी खाक्या दाखविण्यात आला. प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वभर गोल्हे करत आहे. महिला, मुलींची छेड, त्रास किंवा पाठलाग करण्याच्या घटना घडत असतील तर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले. ही कारवाई बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सुंदर चव्हाण, बाळासाहेब शिरसाट, सय्यद अशपाक यांनी केली.
