बीडमध्ये ‘लाडकी बहीण’च्या समित्यांमध्ये राष्ट्रवादीचाच वरचष्मा.
भाजप , शिवसेना(शिंदे गट) यांच्यात कार्यकर्त्या प्रचंड नाराजी.
रोखठोक न्युज वार्ताहर
सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी स्थानिक पातळीवर अशासकीय समित्यांचे गठण केले जात आहे. बीडमधील बहुतांश अशासकीय समित्यांवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा वरचष्मा असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याच समर्थकांची वर्णी लागली आहे. परळी या ४० वर्षांपासून भाजपचा अभेद्या गड म्हणून देशभर ओळख निर्माण केलेल्या विधानसभा मतदार संघातही भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेच स्थान नसून त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे अलिकडे परळीमध्ये आमदार झाल्यानंतर जे स्वागत झाले त्यातही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमापासून दूरच होते. अर्थात ते पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून दूर राहिले असले तरी राज्यात एकत्र सत्तास्थानी असलेल्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर अजूनही मनोमीलन झालेले नसून स्थानिक राजकारणात अंतर ठेवून आहेत. परळीत सध्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये कुठेही सामावून घेतले जात नसल्याचा नाराजीचा सूर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमधून आळवला जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या परळी विधानसभा मतदारसंघासाठीच्या समितीवर तीन अशासकीय सदस्य नियुक्त केले असून त्यात एकही भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता नाही. समितीवरील तीन्ही सदस्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. लाडकी बहीण योजना काही एकट्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम नसून, तो महायुती सरकारचा कार्यक्रम आहे. त्यात भाजप हा राज्यातील मोठा पक्ष असून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अशा समित्यांमध्ये स्थान मिळायला हवे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून बोलून दाखवण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात भाजपकडून लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी चांगले काम सुरू आहे. जवळपास १० हजार अर्ज भरून घेतले आहेत. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय समित्यांचे गठण झाल्याचे वर्तमानपत्रातूनच माहिती आम्हाला मिळाली. आम्हाला विश्वासात न घेताच समित्यांचे गठण झाले आहे.
-राजेंद्र म्हस्के, भाजप जिल्हाध्यक्ष, बीड.
लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समित्यांवर अनेक ठिकाणी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. नेत्यांच्या समन्वयातूनच या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
-अॅड. राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राकाँ (अजित पवार गट)
