जेवणाचे बिल मागितल्याने कारमधून एक किलोमीटरपर्यंत नेले फरफटत तिघांविरोधात गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले. वेटरला बिल आणण्यासाठी सांगितले. दिलेले बिल फोन पेच्या स्कॅनरवर टाकतो, म्हणत बिल न देताच वाहनात जाऊन बसले. त्यानंतर गाडीजवळ आलेल्या वेटरला राज्य महामार्गावरून तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केली. तसेच रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
झाला आहे.
दिंद्रुड पोलिस हद्दीतील मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघे जण जेवणासाठी कारमधून आले होते.
त्यांनी जेवण केले. वेटर शेख साहिल अनुसूद्दीन यांना बिल घेऊन ये, असे सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर ते फोन पेच्या स्कॅनरवर टाकतो, म्हणून तिघे जण वाहनात जाऊन बसले. वेटर स्कॅनर घेऊन ज्या वेळेला वाहना जवळ गेला त्या वेळेस ‘तू आम्हाला बिल का मागतोस’, म्हणून वाद घालत चालकाशेजारी बसलेल्या एक जणाने त्याला धरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर त्यास तिघांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील
११,५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली व गाडीच्या पाठीमागे टाकून डोळ्याला पांढरी पट्टी बांधत अज्ञात स्थळी नेले. त्यावरून सखाराम जनार्दन मुंडे (रा. भाईजळी, ता. धारूर) व अन्य अनोळखी दोघांविरोधात दिंद्रुड पोलिसात रविवारी रात्री उशिरा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अन्वये १४० (३), ११९ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), २८१, १२५ (ए), ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड करीत आहेत
रात्रभर ठेवले ओलीस
शनिवारी रात्रभर अपहृत वेटर गाडीतच होता. दरम्यान, रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरने दिदुड पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.
