• Wed. Apr 29th, 2026

धारदार शस्त्राने सपासप वार करत हॉटेल मालकाला संपवलं,बिलावरून झाला वाद.

Bybaba maske

Apr 21, 2025

धारदार शस्त्राने सपासप वार करत हॉटेल मालकाला संपवलं,बिलावरून झाला वाद.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून धारदार शस्त्राने सपासप वार करत हॉटेल मालकाचा खून करण्यात आला आहे. माजलगाव येथे ही घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बीड जिल्ह्यात खूनाची ही पाचवी घटना आहे.

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपायचं काही नाव घेत नसताना माजलगाव शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी भाजपच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा निर्घृण हत्या, नंतर चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या तर आता बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे. महादेव गायकवाड (वय 54 वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव पुन्हा एकदा निर्घृण हत्येच्या घटनेने हादरले आहे. हॉटेल (ढाबा) मालक व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री उघडकीस आली. यात गंभीर जखमी असलेल्या बाप-लेकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण?

माजलगाव शहरापासून 4 किलोमिटर अंतरावर नागडगाव पाटी कॉर्नरवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड यांची एका टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. महादेव गायकवाड (रा. मंजरथ रोड, माजलगाव) हे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे बसले होते. तितक्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका टोळक्याने बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्याशी वाद घातला. वाद वाढला असता टोळक्याने महादेव गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात महादेव गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टोळक्याने महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष याच्यावरही प्राणघातक हल्ला केला.

उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली..

दोघांना गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, महादेव गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर…

या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये 6 आरोपींविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळेच महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी जोर धरत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!