• Mon. Aug 24th, 2026

दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप जाब विचारणाऱ्या आईला मारहाण; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Bybaba maske

Aug 23, 2026

दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप

जाब विचारणाऱ्या आईला मारहाण; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

रोखठोक न्यूज केज

केज तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील एका गावात इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या सात वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच दोघांनी खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पीडितेच्या आईने जाब विचारला असता तिलाही मारहाण करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान चिमुकलीला खाऊचे व इतर आमिष दाखवून बोलावून नेण्यात आले. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घटना समजल्यानंतर पीडितेच्या आईने संबंधितांकडे जाब विचारला. यावेळी संशयितांच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या आईला मारहाण केली तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

मात्र पीडितेच्या आईने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

यातील एका संशयिताचे वय १९ वर्षे असून त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा संशयित १५ वर्षांचा असल्याने त्याच्यावर बाल न्याय मंडळाच्या नियमानुसार कार्यवाही सुरू आहे.

चिमुकलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिमुकलींना आमिष दाखवून त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण देऊन प्रकरणाची निष्पक्ष आणि वेगवान चौकशी करण्याची मागणी होत आहे.

— रोखठोक न्यूज
जन सामान्याच्या अन्यायाविरोधात आवाज

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!