जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दोघे ताब्यात, टाटा सुमो जप्त
बडवणी : बडवणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास करताना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मिथुन दादाराव साळवे (वय २५, रा. रमाईनगर, बडवणी, ता. बडवणी, जि. बीड) आणि रोहन कल्याण केकान (वय २५, रा. जुना मोढा, बडवणी, ता. बडवणी, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एमएच-२३ ई-६५४४ क्रमांकाची टाटा सुमो गाडी, किंमत अंदाजे १ लाख रुपये, जप्त करण्यात आली आहे.
बडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६८/२०२६ कलम ३०९(४), ३५१(३), ३(५) भारतीय न्याय संहिता तसेच गुन्हा क्रमांक १६९/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा समांतर तपास बीड स्थानिक गुन्हे शाखा व बडवणी पोलिसांकडून सुरू होता.
दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड येथील पोउपनि महेश बिन्ने, पोहे/महेश जोगदंड, पोहे/जफर पठाण, पोहे/बप्पासाहेब घोडके, पोहे/दिलीप गित्ते आणि चापोह/गणेश मराडे हे आरोपींचा शोध घेत उपविभाग माजलगाव हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी मिथुन साळवे व रोहन केकान हे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो गाडीने लव्हकुडे रोडने पाडुळच्या दिशेने येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून तेलगाव गावाच्या शिवारात पाटलागा करून दोघांना एका शेतामधून शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मिथुन दादाराव साळवे आणि रोहन कल्याण केकान अशी सांगितली.
पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी सदर दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. त्यांच्या ताब्यातून टाटा सुमो वाहन क्रमांक एमएच-२३ ई-६५४४ जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून बडवणी हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर दोन्ही आरोपी व जप्त टाटा सुमो वाहन बडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास बडवणी पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई, उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव तसेच पोलिस निरीक्षक शिवाजी बेंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश बिन्ने, पोहे/महेश जोगदंड, पोहे/जफर पठाण, पोहे/बप्पासाहेब घोडके, पोहे/दिलीप गित्ते आणि चापोह/गणेश मराडे यांनी केली.
— रोखठोक न्यूज जन सामान्याच्या अन्याया विरोधात आवाज
