केज पोलिसांची धाडसी कारवाई
कळंबकडे एक कोटी रु. चा गुटखा घेऊन जात असलेला ट्रक घेतला ताब्यात !
रोखठोक न्यूज
गौतम बचुटे/केज :- धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे मध्यप्रदेशातून गुटखा घेऊन निघालेला ट्रक केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रक खचाखच गुटख्याने भरलेला असून तो मुद्देमाल १ कोटी १ लाख ५२ हजार रु. किंमतीचा आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ७ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातून केज मार्गे कळंब जि. धाराशिवकडे गुटखा घेऊन एक ट्रक केजच्या दिशेने येत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्यांच्या पथकाला ट्रक क्र. (डी डी-०२/एस-९४४२) ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. सदर ट्रक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भरधाव वेगात कळंबच्या दिशेने वळविण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलिस कॉन्स्टेबल हनुमान मुंडे, पोलिस कॉन्स्टेबल शमीम पाशा, वाहन चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांनी पाठलाग करून केज पासून दीड कि. मी. अंतरावर या भरधाव वेगातील ट्रकला पोलिसांनी ओव्हरटेक करून कळंब रोडवर असलेल्या कमल पेट्रोलियम पेट्रोल पंपा जवळ पोलिस गाडी आडवी लावून ट्रक थांबवला. पोलिसांनी इशारा करून ट्रक थांबताच ट्रक ड्रायव्हर शेजारी बसलेला एक इसम परशुराम मोहन गायकवाड, हा ट्रक मधून उडी मारून एका शेतात पळून गेले. त्यांच्या मागे चिखल तुडवत आणि काट्या-कुट्यातून पोलिस फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत असताना त्यांनी गुंगारा देऊन उसाच्या शेतात जाऊन लपून बसला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अशी माहिती दिली की, जालीमसिंग (रा. बुऱ्हाणपूर, ता. जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) याने हा गुटखा इंदौर येथुन ट्रक मध्ये भरुन दिला. तो गुटखा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापारी रुपेश मालपाणी रा. कळंब जि धाराशिव यांना पोहोच करायचा होता.
केज पोलिसांनी रईसोयीन अमीरोद्दीन शेख, वय (५९ वर्षे), (रा. मील्लतनगर, ओकाला रोड, ता. जि. रतलाम, मध्यप्रदेश), परशुराम मोहन गायकवाड, वय (२२ वर्षे), (रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि अहिल्यानगर ह. मु. बीड), या दोघांना ताब्यात घेऊन सदर ट्रक पोलिस ठाण्यात आणला.
त्या ट्रकची पंचा समक्ष झडती घेतली असता त्या ट्रकमध्ये असलेल्या ७४ लाख ५२ हजार रु. च्या गुटख्यासह १ कोटी १ लाख ५४ हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
