अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज आकडा फुगवून सांगण्यात आला!
३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
रोखठोक न्यूज वार्ताहर
नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या आदल्या दिवशी राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून स्वतःची राजकीय सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा अधिक मदत दिल्याचं नॅरेटिव्ह सरकार सेट करू पाहत आहे. हे पॅकेज तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तो अर्थातच खोटा आहे. प्रत्यक्षात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या योजनांची गोळाबेरीज करून आकडा फुगवलाय. ते वजा केले तर या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या वाट्याला नव्याने केवळ तीन ते चार हजार कोटी रूपये येण्याची चिन्हे आहेत.
एनडीआरएफमधून नुकसानीपोटी मिळणारी जवळपास साडेसहा हजार कोटी, इतर योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आधीच तरतूद केलेले १० हजार कोटी, पीक विम्याचे (संभाव्य) ५ हजार कोटी आणि एनडीआरएफच्या निकषापेक्षा राज्य सरकारने अधिकचे देऊ केलेले १० हजार कोटी अशी गोळाबेरीज करून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचा आकडा जुळवला आहे.
वास्तविक पीक, पशुधन व जमिनीचे नुकसान आणि जीवित हानी यासाठी एनडीआरएफमधून मदत मिळतेच. तसेच पीकविमा ही स्वतंत्र योजना आहे. त्यामुळे एनडीआरएफची मदत आणि पीकविमा राज्याच्या पॅकेजचा भाग म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे. राज्याने पॅकेज जाहीर केले नसते तरी या दोन्ही माध्यमातून ठरलेल्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणारच होती. परंतु केवळ आकडा फुगवून सांगण्यासाठी ही गोळाबेरीज करण्यात आली.
– रमेश जाधव, ॲग्रोवन
