कानडी माळी येथील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
रोखठोक न्यूज | केज (जि. बीड)
केज तालुक्यातील कानडी माळी येथून रात्री चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉली प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सतिष सुदाम बनसोडे (रा. कानडी माळी, ता. केज) यांनी त्यांच्या घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 212/2026 कलम 303(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
तपासादरम्यान पथकाने घटनास्थळाजवळील 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आरोपी आपल्या घरी आल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला.
दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता पायतळवाडी (ता. माजलगाव) येथून आरोपी रामदास आसाराम श्रीराम (वय 25) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले ट्रॅक्टर शेतामध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेला आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस आणल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मार्गदर्शनाखालील पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके (अंबाजोगाई) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते, विकी सुरवसे, गणेश मराडे व विकास राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.
