केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन
फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड
रोखठोक न्यूज केज (प्रतिनिधी)
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज शहरात ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ या संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्ष, क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान व महापुरुष जन्मोत्सव समिती, केज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भवानी चौक येथील मुक्ताई फंक्शन हॉल येथे कार्यक्रमास प्रारंभ होणार असून सायं. ७.०० वाजता महानाट्याचे सादरीकरण सुरू होईल. हैदराबाद येथील अभ्युदय आर्ट्स अकादमीचे २२ नाट्यकलावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षगाथा हिंदी भाषेतून प्रभावीपणे सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते रणजितसिंह पाटील तसेच माजी पंचायत समिती सभापती राजेसाहेब पापा देशमुख यांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या संगीतमय महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. केज शहरात प्रथमच अशा प्रकारचे महानाट्य सादर होत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे, अॅड. निखील बचुटे, रंजित घाडगे, प्रदीप गायकवाड, शेख रज्जाक, अक्षय हजारे, गुड्डू खतीब, मंगेश देशमुख, राजेभाऊ गुंड, अजिंक्य माने, नावेद मुलानी, दत्ता वाघमारे, शाम चिंचोलीकर, रामलिंग पाटील आदींचा सहभाग आहे.
