नेकनूरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून वाद पेटणार? ग्रामपंचायतीच्या पत्रामुळे भीमसैनिक संतप्त!
अनधिकृत ठरवत पुतळा हटवण्याची मागणी; जयंतीनंतर अचानक बदललेल्या भूमिकेमुळे संशयाचे सावट
रोखठोक न्यूज वार्ताहर नेकनूर
बीड तालुक्यातील नेकनूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आठवडी बाजार तळावर उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला सुरुवातीला कोणताही विरोध नसताना, आता ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
मंगळवारी (दि. १४) बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अनिता लांडगे व ग्रामविकास अधिकारी डी. एस. नागरे यांनी १३ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवरून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत संबंधित पुतळा “अनधिकृत” असल्याचे नमूद करत तो हटवण्याची मागणी केली आहे. हे पत्र १५ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भीमसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, पुतळा उभारल्यानंतर स्थानिक पातळीवर कोणताही विरोध झाला नव्हता. उलट नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून अभिवादन केले होते. जयंतीही शांततेत पार पडली. त्यामुळे अचानक ग्रामपंचायतीने घेतलेल्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप व्यक्त होत आहे.
नेकनूरची बाजारपेठ मराठवाड्यातील महत्त्वाची मानली जाते. येथे सर्व समाजघटकांची मोठी वर्दळ असते. भविष्यात इतर महापुरुषांचेही पुतळे उभारले जाऊ शकतात, त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, “पुतळ्याला कुणाचाही विरोध नसताना हटवण्याची मागणी का?” असा सवाल उपस्थित करत अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणामुळे दोन गटांमध्ये संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व संबंधित पक्षांना विश्वासात घेऊन तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
