• Sat. Apr 18th, 2026

केज नगरपंचायत घरकूल घोटाळ ठेकेदारांकडून कोट्यवधींची वसुली; मिलिंद सावंत, नीता अंधारेसह अधिकाऱ्यांवर फौजदारीची टांगती तलवार! चार कोटींच्या नियमबाह्य वितरणाचा भंडाफोड; चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

Bybaba maske

Apr 11, 2026

केज नगरपंचायत घरकूल घोटाळ ठेकेदारांकडून कोट्यवधींची वसुली; मिलिंद सावंत, नीता अंधारेसह अधिकाऱ्यांवर फौजदारीची टांगती तलवार!

चार कोटींच्या नियमबाह्य वितरणाचा भंडाफोड; चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

रोखठोक न्यूज वार्ताहर 

नगर पंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून ठेकेदारांकडून वसुली करून निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत, लेखापाल असद खतीब तसेच तत्कालीन प्रशासकीय अधिकारी नीता अंधारे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे.

चौकशी अहवालानुसार, प्रधानमंत्री नागरी आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली सुमारे चार कोटी रुपयांची रक्कम नियमबाह्य पद्धतीने वितरित करण्यात आली. ही रक्कम थेट लाभार्थ्यांना न देता ठेकेदार व पुरवठादारांकडे वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच काही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर वर्ग केल्याचेही उघड झाले आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना मिलिंद सावंत यांच्या स्वाक्षरीने मोठ्या प्रमाणावर धनादेश काढण्यात आले. तर लेखापाल असद खतीब यांच्या स्वाक्षरीनेही कोट्यवधींचे व्यवहार झाले. पुढे नीता अंधारे यांच्या कार्यकाळातही निधी वितरणात गंभीर अनियमितता झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले असून त्यांच्या विरोधातही शिस्तभंग व फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

याशिवाय सहाय्यक लेखापाल लक्ष्मण जगताप, कर्मचारी भास्कर ससाणे, व बासेद काजी यांच्या नावांचाही अहवालात उल्लेख असून त्यांच्या खात्यावर लाखो रुपयांची रक्कम वर्ग झाल्याचे समोर आले आहे.

चौकशी समितीने संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांव्यतिरिक्त रक्कम घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची ठोस शिफारस केली आहे. तसेच ठेकेदारांकडून वसुली करून ही रक्कम प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देण्याचे आदेश देण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान, सहाय्यक आयुक्त संभाजी वाघमारे यांनी चौकशी अहवाल लवकरच वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!