मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत नवा राजकीय रंग; अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी चुरस
बिनविरोधच्या चर्चांना धक्का; २९ तारखेला मतदार ठरवणार नवा सरपंच
रोखठोक न्यूज मस्साजोग | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत नवा राजकीय रंग भरला असून बिनविरोध निवडीच्या चर्चांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना त्यांनी पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासह गावातील प्रलंबित पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. गावात भावनिक वातावरण असताना अश्विनी देशमुख यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
मात्र, या निवडणुकीत आता नवे समीकरण निर्माण झाले असून माजी प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून “अंतिम निर्णय लोकशाहीत मतदारांनी घ्यायचा,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
यामुळे मस्साजोग ग्रामपंचायतीची ही निवडणूक आता बिनविरोध न राहता थेट प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायतीत एकूण २,२८४ मतदार असून येत्या २९ तारखेला मतदान होणार आहे. नव्या सरपंचाचे भवितव्य मतपेटीतून ठरणार असून उर्वरित १८ महिन्यांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना अश्विनी देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
