सम्राट नगर, अंबाजोगाई येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव
११ ते १४ एप्रिल दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; मुला-मुलींना बक्षीस वितरण
रोखठोक न्यूज वार्ताहर | अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरातील नवीन मोरेवाडी परिसरातील सम्राट नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करून परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या जयंती उत्सवाची सुरुवात ११ एप्रिल रोजी मुला-मुलींसाठी गायन, नृत्य व भाषण स्पर्धांनी झाली. यासोबतच चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
१२ एप्रिल रोजी अनिल तलवार यांच्या प्रबोधनपर गायन पार्टीचे आयोजन करण्यात आले, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १३ एप्रिल रोजी महिला मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
१४ एप्रिल रोजी जयंती दिनी सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच औदुंबर मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेप तसेच मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्य विशाल सोनवने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे करत बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णू पोटभरे, सम्राट अशोक बुद्ध विहाराचे अध्यक्ष दत्तात्रय सांवत, तसेच सुभाष साळवे, रविंद्र आचार्य, विष्णू सातपुते, भिमानंद गजभारे, भिकाजी जोंगदड, राजाभाऊ कांबळे,जयपाल वाघमारे, आणि सतिश जोंगदड यांनी परिश्रम घेतले.
सम्राट नगर परिसरात पार पडलेल्या या जयंती उत्सवामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
