केज तहसीलदारांचा अपघात की घात? गूढ कायम
तपासाकडे लक्ष • राकेश गिड्ढे बुधवारी रेणापूर हद्दीत रात्री मुक्कामानंतर पहाटे निघाले होते लातूरकडे
रोखठोक न्यूज वार्ताहर केज/ लातूर
केजचे (जि. बीड) तहसीलदार राकेश गिड्ढे यांच्या अपघाताचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे. पहिल्याच दिवशी या घटनेबाबत संशय बळावल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पहाटे अंधारात टोलनाका ओलांडताना गाडीत असलेला ‘तो’ दुसरा अधिकारी आणि अपघातानंतर गायब झालेला मोबाईल, या दोन गोष्टींनी अनेक संशयास्पद प्रश्न उभे केले आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून तपास थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपवण्यात आला आहे. गिड्ढे यांच्या प्रवासातील त्या ‘सोबत्याचा’ शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. रेणापूर मुक्कामी सीसीटीव्ही फुटेजवरून प्रवासात त्यांनी दोन वाहने बदलल्याचे समोर आले आहे. अपघाती कार आणि सीसीटीव्ही फुटेजमधील कार वेगवेगळ्या असल्याचे प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्ढे यांच्या गाडीला ९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई–लातूर मार्गावरील रेणापूर ते गोपाळनगर दख्यानच्या वळणावर भीषण अपघात झाला होता. इतक्या पहाटे ते लातूरकडे कशासाठी निघाले होते? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
दरम्यान, नवी माहिती समोर आली आहे. गिड्ढे यांची कार ८ एप्रिल रोजी सायंकाळी अंबाजोगाई–लातूर महामार्गावरील सेलूअंबा टोलनाका ओलांडताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या वेळी त्यांच्या कारमध्ये आणखी एक इसम बसलेला होता. मात्र अपघातावेळी गाडीत केवळ गिड्ढे यांचाच मृतदेह आढळला.
प्रवासात तिसरी व्यक्ती, दुसरी कारही सोबत
तपासातील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे वाहनांची अदलाबदल. सेलूअंबा टोलनाक्यावरून जी कार पास झाली आणि ज्या कारचा रेणापूरजवळ अपघात झाला, त्या दोन्ही कार वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रवासात कार बदलण्याची गरज का भासली? याच प्रवासात त्यांच्यासोबत तिसरी व्यक्ती दुसऱ्या कारमधून चालली होती, असेही पुरावे आढळले आहेत. या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
नातेवाईकांची सखोल तपासाची मागणी
अपघातात मृत झालेले तहसीलदार राकेश गिड्ढे यांच्या नातेवाईकांनी या घटनेचा सखोल व पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण रेणापूर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की :
“तहसीलदार गिड्ढे यांच्या अपघात प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व शक्यतांवर तपास केला जात आहे.”
मोबाईल डाटा विश्लेषणातून नवे धागेदोरे
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तहसीलदार गिड्ढे यांच्या मोबाईलचे डिटेल्स काढण्यात आले आहेत. तसेच अपघात स्थळाचा डंप डाटा देखील गोळा करण्यात आला आहे.
८ ते ९ एप्रिलच्या रात्री गिड्ढे यांचा मोबाईल याच परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. या काळात ते नेमके कुठे थांबले होते? किंवा त्यांचा मोबाईल इतर कुणी वापरत होते का? याचा तपास सुरू आहे.
‘पांढरे डाग’ असलेली ती व्यक्ती कोण?
तहसीलदार गिड्ढे जेव्हा रेणापूर परिसरात आले, त्यावेळी त्यांच्या सोबत एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीच्या राहणीमानावरून तो मोठा अधिकारी असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्या व्यक्तीच्या हातावर आणि चेहऱ्यावर पांढरे डाग होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या सोबत आणखी एक तिसरी व्यक्ती दुसऱ्या कारमधून आली होती. त्या व्यक्तीचीही ओळख अद्याप पटलेली नाही.अपघातावेळी मात्र गाडीत गिड्ढे एकटेच आढळल्याने या दोन्ही व्यक्तींवर संशयाची सुई स्थिरावली आहे. पोलिस त्या अधिकाऱ्याचा आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहेत.
घटनाक्रम आणि पुरावे
८ एप्रिल रोजी सायंकाळी सेलूअंबा टोलनाका ओलांडला (सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध)
टोल ओलांडलेली आणि अपघात झालेली कार वेगवेगळ्या
घटनाक्रमात तिसऱ्या व्यक्तीचे पुरावे; दुसऱ्या कारमधून रेणापूर येथे आगमन.
एकूणच, केज तहसीलदार राकेश गिड्ढे यांच्या मृत्यूमागील गूढ अधिकच गडद होत असून अपघात की घात, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. एलसीबीकडून सुरू असलेल्या तपासातून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

