• Sat. Apr 18th, 2026

केज नगरपंचायत घरकुल घोटाळा  अखेर घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर केज ठाण्यात फिर्याद दाखल परवानगीपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांची घाई; प्रश्नचिन्ह उपस्थित

Bybaba maske

Apr 17, 2026

केज नगरपंचायत घरकुल घोटाळा 

अखेर घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर केज ठाण्यात फिर्याद दाखल

परवानगीपूर्वीच मुख्याधिकाऱ्यांची घाई; प्रश्नचिन्ह उपस्थित

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

गोरगरिबांच्या घरकुल अनुदानातील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी केज नगरपंचायतीतील तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात अखेर केज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, गुन्हा नोंदणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घरकुल घोटाळ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. समितीने सादर केलेल्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह ठेकेदारांकडून अनुदानाची रक्कम वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

चौकशीत प्रधानमंत्री नागरी आवास योजनेअंतर्गत ३७६ घरकुल लाभार्थ्यांचे तब्बल ४ कोटी २४ लाख रुपये ठेकेदारांना देण्यात आल्याचे उघड झाले. तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत, लेखापाल असद खतीब, तसेच अधिकारी नीता अंधारे यांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे ही रक्कम वितरित करण्यात आली होती. याशिवाय नगरपंचायतीचे कर्मचारी भास्कर ससाणे यांना ५९ लाख रुपये, तर वासेद काझी यांना १९ लाख रुपये देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणात मिलिंद सावंत, असद खतीब, लक्ष्मण जगताप, भास्कर ससाणे, भीमराव मस्के आणि बासेद काझी यांच्यावर शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे व शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच नीता अंधारे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई सुचविण्यात आली आहे.

दरम्यान, केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित धोपे यांनी केज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असली, तरी गुन्हा नोंदणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी सांगितले. त्यामुळे परवानगी मिळण्यापूर्वीच फिर्याद दाखल करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, संबंधितांवर लवकरच गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!