• Wed. Apr 22nd, 2026

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; ब्लॅकस्पॉट कमी करा रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा. बजरंग सोनवणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Bybaba maske

Apr 22, 2026

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; ब्लॅकस्पॉट कमी करा

रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा. बजरंग सोनवणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

रोखठोक न्यूज वार्ताहर | बीड

मागील दोन वर्षांत रेल्वे कामाला गती देण्यात आली असून आता उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे–परळी रेल्वे सुरू झालीच पाहिजे, असे ठाम निर्देश खा. बजरंग सोनवणे यांनी दिले. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्त्यांवरील अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणे तातडीने कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे आणि नागरिकांच्या अडचणी यांसह विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह रेल्वे व महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा आणि माजलगाव या शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती, पिंपळा धायगुडा–लोखंडी सावरगाव–केज–मांजरसुंबा–पाटोदा–चुंबळी फाटा या मार्गाचे दुहेरीकरण, तसेच अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

सुरत–चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची सद्यस्थितीही तपासण्यात आली. खरवंडी–मादळमोही–पाडळसिंगी–गढी–माजलगाव मार्गावरील खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत तक्रारी येत असल्याने तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. तसेच तालखेड फाटा, शृंगारवाडी फाटा आदी ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

माजलगाव–धारूर–केज (रामा ५४८ सी) या रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने संबंधित एजन्सीकडून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. धारूर घाटातील थेटेगव्हाण पर्यायी मार्ग तसेच बर्दापूर–लोखंडी सावरगाव दुहेरीकरणाच्या निविदांबाबतही माहिती घेण्यात आली. पाटोदा व आष्टी तालुक्यातील अंमळनेर–टाकळी काजी तसेच गेवराईतील राक्षसभुवन फाटा–उमापूर–शेवगाव या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

पालखी मार्गाबाबत नाराजी

पैठण–पंढरपूर पालखी मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव (अनपटवाडी) या भागातील अतिशय खराब रस्ता, मळेकर घाटातील अपूर्ण कामे, मोठ्या भेगा आणि वारंवार होणारे अपघात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पाटोदा शहरातील अपूर्ण रस्ता काम निकषानुसार पुन्हा करण्याचे, संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याचे आणि अनावश्यक खर्चाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

खोदलेल्या रस्त्यांकडे लक्ष

माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे खोदलेला रस्ता तातडीने सुरू करण्याचे, तेलगाव येथे साचणारे पावसाचे पाणी काढण्याचे तसेच मांजरसुंबा–अंबाजोगाई मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता समपातळीवर आणण्याचे आदेश देण्यात आले.

रेल्वे कामांचा सखोल आढावा

अहमदनगर–बीड–परळी रेल्वेमार्गाच्या सर्व टप्प्यांवरील कामांचा आढावा घेण्यात आला. ३१ मेपर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्ण होऊन जूनमध्ये चाचण्या होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आष्टी स्थानकास वीज जोडणी, बीड–वडवणी, वडवणी–सिरसाळा आणि सिरसाळा–परळी या टप्प्यांतील सिव्हिल वर्क, भूसंपादन व रुळ अंथरण्याच्या कामांची माहिती घेण्यात आली.

बीड–नगर–मुंबई व बीड–नगर–पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आष्टी, पाटोदा, शिरूर व बीड तालुक्यातील विविध ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज उभारण्याची गरज मांडण्यात आली. बार्शी नाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा, पालवन व बार्शी नाका स्थानकांसाठी पार्किंग सुविधा तसेच सर्व स्थानकांवर सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

गंभीर मुद्द्यांवरही फोकस

रेल्वेमुळे शेतीमाल वाहतुकीत येणारे अडथळे, पुलाखाली साचणारे पाणी, अपूर्ण रस्ते, प्रकाशयोजनेचा अभाव तसेच भूसंपादनातील अनियमितता व भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. रायमोहा, शिरापूर, मोरजळवाडी, गोमळवाडा, विघ्नवाडी, नागरेचीवाडी आदी गावांतील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

बीडमधील रस्ते कामांवर अधिकाऱ्यांना फैलावर

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे खा. सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. “माझ्या बीडमधील नागरिकांना होणारा त्रास तात्काळ कमी झाला नाही, तर कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

घाटनांदूर रेल्वे थांब्यासाठी प्रस्ताव द्या

घाटनांदूर येथे विविध रेल्वेंना थांबा देण्याबाबत तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देत या मागणीसाठी आपण पाठपुरावा करू, असे खा. बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.

baba maske

Related Post

कानडी रोडकडे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप; पुढाऱ्यांवर सवाल यश कन्स्ट्रक्शन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!