केज पोलिसांची दहशत माजवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई; तलवार, सुरा अन् खंजीर जप्त!
नामेवाडी येथे छापा; तलवारीने केक कापून दहशत माजवणाऱ्या दोघांवर कारवाई
रोखठोक न्यूज | केज
केज तालुक्यात तलवारीने केक कापून दहशत माजवणाऱ्यांविरोधात केज पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नामेवाडी येथे छापा टाकून पोलिसांनी तलवार, सुरा आणि खंजीर अशी शस्त्रे जप्त केली. या कारवाईत अजय अशोक तांदळे आणि सदाशिव नामदेव आंधळे या दोघांविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी केज पोलिस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब अहंकारे यांनी ‘krishpanchal302’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील पाहिली. त्यामध्ये अजय अशोक तांदळे आणि एका अनोळखी व्यक्तीचा वाढदिवस साजरा करताना दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवारीने केक कापल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. ९ ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत तलवारीने केक कापण्यासाठी वापरलेले शस्त्र सदाशिव आंधळे यांच्या नामेवाडी येथील घरी ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तेथे छापा टाकून ४० इंच लांबीची तलवार, १० इंच लांबीचा खंजीर आणि ८ इंच लांबीचा खंजीर अशी तीन शस्त्रे जप्त केली.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार तसेच डी.बी. पथकातील पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.
केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत तलवारीने केक कापून दहशत माजवत वाढदिवस साजरा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिला आहे.
रोखठोक न्यूज, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज!
