शेतातून मेंढ्या घेऊन येणाऱ्या पतीच्या मदतीसाठी निघालेल्या महिलेस रस्त्यात अडवून विनयभंग केल्याच्या आरोपावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीवर युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही २१ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शेतातून मेंढ्या घेऊन येत असलेल्या पतीच्या मदतीसाठी आडवे जात होती. याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी बब्रुवान इंगळे हे तिच्या पाठीमागून दुचाकीवर आले. त्यांनी तिला कुठे चाललीस व घरी लावलेल्या दुधाचे पैसे किती झाले. अशी विचारणा केली. मात्र मला गडबड आहे, उद्या सकाळी घरी येऊन हिशेब सांगते. असे म्हणून महिला पुढे निघून जाऊ लागला असता दुचाकी आडवी लावून रस्ता अडवून वाईट हेतूने जवळ ओढण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. घाबरलेल्या महिलेने हिसका देत पतीकडे धाव घेतली. त्यानंतर संभाजी इंगळे तेथून पसार झाले. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी इंगळेविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात जमादार आर. के. सिरसट हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, विनयभंग प्रकरणी संबधीत आरोपीला कायदेशीर नोटीस देण्यात आली असल्याची माहिती युसुफवडगाव ठाण्याचे सपोनि डॉ. संदीप दहिफळे यांनी दिली.