*दाढी कटिंगच्या कारणावरून दारुड्याने न्हाव्यास ब्लेड मारली*
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात एका दारुड्याने हजामत का केली नाहीस? असे म्हणून दारूच्या नशेत तर्रर् असलेल्या एका दारुड्याने न्हावी काम करणाऱ्या एका तरुणाच्या हातावर ब्लेड मारून जखमी केले आहे.
केज तालुक्यातील कानडी माळी येथे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वा. च्या सुमारास उमेश बाबासाहेब राऊत हा दारूच्या नशेत तर्रर्र असलेला दारुड्या इसम बाळासाहेब नामदेव सुरवसे वय (२० वर्ष) याच्या दाढी कटींच्या दुकानात गेला आणि त्याला म्हणाला की, दाढी कटिंग का केली नाहीस? असे म्हणून बाळासाहेब सुरवसे याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्याच दुकानातील धारदार ब्लेड घेऊन त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला; मात्र बाळासाहेब सुरवसे याने तो ब्लेडचा वार चुकवून डाव्या हातावर झेलला. त्यामुळे बाळासाहेब सुरवसे याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर धारदार ब्लेडच्या वाराने जखम झाली असून रक्तस्त्राव झाला. तसेच त्या दारुड्याने त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्यास पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान बाळासाहेब सुरवसे याच्या फिर्यादी वरून उमेश बाबासाहेब राऊत या दारुड्या इसमा विरुद्ध दि. ११ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६०/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ प्रणाने गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
————————————————
