पंधरा लाखाच्या फसव्या आमिषाला भुलला पण पोलिसांमुळे दीड लाखाला वाचला
नका ना गडयांनो कुणाला ओटीपी देऊ….! या बातमीने वाचले दीड लाख रु.
गौतम बचुटे/केज:- केज येथे एक कृषि उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंग करीत असलेल्या व्यक्तीला ॲक्सिस बँके कडून १५ लाखाचे कर्ज देण्यात येत असल्याचे सांगून त्यांना ओटीपी मागून फसवणूक करून खात्यातून दीड लाख रु. ला गंडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. पण सदर व्यक्तीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी तात्काळ संपर्क साधल्यामुळे फसवणूक टळली.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे कृषी उत्पादनाची ऑनलाइन मार्केटिंग करणारे सुरेश काळे यांना गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा च्या सुमारास एका अनोळखी नंबरहून फोन आला. फोन करणारी अनोळखी व्यक्तीने स्त्रीच्या आवाजात सांगितले की, ती अंबाजोगाई येथील ॲक्सिस बँकेतून पवार मॅडम बोलत आहे. तुम्ही त्यांच्या बँकेचे ग्राहक असून त्यांचे बँकेचे सर्व रेकॉर्डस् पाहून बँक त्यांना १५ लाख रु. चे कर्ज देणार आहे. त्यासाठी मोबाईवर एक लिंक येईल; ती डाऊन लोड करून सर्व प्रोसेस पूर्ण करा. त्या प्रमाणे सुरेश काळे यांनी सर्व प्रक्रिया केली. त्या नंतर त्यांना मोबाईलवर एक ओटीपी आला त्यांनी त्या महिलेला कळविला पण तो एकदा अयशस्वी झाला. त्या नंतर त्यांना दुसरा ओटीपी आला आणि तो यशस्वी झाला.
त्या नंतर सुरेश काळे यांना शंका आली. त्यांनी पुन्हा त्या महिलेला फोन लावून विचारले की, त्यांचे एक नातेवाईक याच ॲक्सिस बँकेच्या अंबाजोगाई शाखेत कार्यरत आहेत. त्यांना तुम्ही ओळखता का ? तर त्या महिलेने उत्तर दिले की, तिचे प्रशिक्षण सुरू असून ती लवकरच बँकेत रुजू होणार आहे. तसेच काळे यांनी त्यांच्या बँकेतील नातेवाईकानाही फोन करून या घटनेची माहिती दिली. तेव्हा अशी कोणतीही महिला बँकेत नसून ओटीपीमुळे फसवणूक होऊन परस्पर खात्यातील पैसे काढले जाण्याचा धोका असतो असे सांगितले. म्हणून काळे यांनी पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. मग त्यांना शंका आली आणि त्यांनी थेट केज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना फोन करून सर्व घटनाक्रम सांगितला. सपोनि शंकर वाघमोडे याना तात्काळ ही माहिती बँकेला देऊन त्यांच्या खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याचे काळे यांना सांगितले. सुरेश काळे यांनी तात्काळ बँकेतील नातेवाईका मार्फत त्यांच्या खात्यातील जमा रकमे पैकी १ लाख ४० हजार रु. मुदत ठेव योजनेत वर्ग केले आणि आठ हजार रु. हे फोन-पे वॉलेट मध्ये वर्ग केले. त्यामुळे काळे हे सपोनि वाघमोडे यांच्यामुळेच फसव्या व खोट्या आमिषाला बळी पडण्यापासून वाचले.
चौकट :-
सपोनि वाघमोडे यांच्या आव्हानामुळे वाचले दीड लाख रु :-
मागील काही दिवसांपूर्वी सपोनि वाघमोडे यांनी फसवे कॉल करून होणारी फसवणूक टाळण्याचे आवाहन केले होते. त्याची वर्तमान पत्रातून ” नका ना गडयांनो कुणाला ओटीपी सांगू..!” मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. ते वृत्त अनेकांनी वाचलेले होते. म्हणून काळे यांचे दीड लाख रु. ची फसवणूक टळून त्यांचे पैसे वाचले अशी चर्चा सुरू आहे.