माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान दिंद्रुड पोलिसात पाच संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने दिंद्रुड परिसर हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात येथे एका शेतकऱ्याकडे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एक कुटुंब साल गडी म्हणून काम करते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आई-वडील शेतात कामाला गेले असताना संशयीत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ याने पीडित मुलीला एका उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही 17 वर्षाची अल्पवयीन आहे. या घटनेमुळे दिंद्रुड व परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात एका महिलेसह चार जणांवर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना तात्काळ अटक केली. दरम्यान दोन संशयीत आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.