गौतम बचुटे/केजब:- केज तालुक्यातील साळेगांव येथे एका ऊस तोड मजुराच्या घराला आग लागून त्यात मुलाच्या लग्नाचा बस्ता, कपडे, भांडे, लग्नासाठी बनविलेले दागिने, किराणा सामान आणि नगदी रोख रक्कम जळून खाक झाले. ही आग गॅस टाकीच्या गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान साळेगांव ता केज येथील उसतोड मजूर सय्यद शफीक दगडू यांच्या पत्र्याच्या घराला आग लागली. त्यात त्यांनी त्यांचा मुलगा सय्यद रसूल शफीक यांच्या लग्नासाठी खरेदी केलेले कपडे, लग्नाचा बस्ता, नवरी मुलीसाठी खरेदी केलेले सोन्याचे दागिने, किराणा सामान आणि रोख रक्कम हे जळून खाक झाले. घराला आग लागल्या नंतर ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. आगीची माहिती केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, तहसीलदार जगतात, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना माहीती मिळताच त्यांनी अग्निशामक विभागाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाचीची गाडी पोहोचे पर्यंत घर आणि आतील सर्व सामान जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत घर आणि सर्व सामान जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. ही आग गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
—————————————————-
मदतीसाठी ग्रामस्थांचे हात सरसावले :- सय्यद शफीक यांच्या मुलगा सय्यद रसूल याचे दि. ९ जुलै गेवराई तालुक्यात लग्न आहे. मात्र सर्व बस्ता, कपडे दागिने आणि अन्नधान्य जळाले असल्याने लग्न कसे करावे हा प्रश्न सय्यद कुटुंबापुढे असल्याने, माजी उपसरपंच अमर मुळे, लक्ष्मण लांडगे, कैलास पटणे आणि लक्ष्मण ओव्हाळ यांनी पुढाकार घेऊन गावातून सय्यद कुटुंबासाठी मदत जमा करण्याचे आवाहन केले त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे.
———————————————-
प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी सय्यद कुटुंबाला मदत करावी :- या जळीत घटनेने सय्यद कुटुंब हे बेघर झाले असून ते उघडयावर आले आहे म्हणून त्या कुटुंबाला सरकारी मदती बरोबरच लोकप्रतिनिधी कडून तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.