वडिलांच्या अनैतिक संबंधावरून मुलांची मारहाण त्यात वडिलांचा मृत्यू.
संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तीन मुलांवर गुन्हा दाखल
रोखठोक न्युजवार्ताहर
वडिलांचे शेजारी महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून तीन मुलांनी बोअरच्या विद्युत मोटारीच्या प्लास्टिक पाईपने अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर जखमी पित्यास संबधित महिलेच्या घरासमोर आणून टाकले. मात्र त्या महिलेने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र तिसऱ्या दिवशी पित्याचा मृत्यू झाला. ही घटना केज शहरातील अहिल्यादेवी नगरमध्ये घडली असून मारहाण करणाऱ्या तिन्ही मुलांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील अहिल्यादेवी नगर भागातील तक्रारदार ४८ वर्षीय महिलेचे तिच्या शेजारी असलेल्या मनोहर भगवान गायके ( वय ४५ ) याच्यासोबत मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यावरून १९ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान मनोहर यास त्याची पत्नी पार्वती गायके हिने शिवीगाळ केली. तर त्याची मुले कृष्णा, ईश्वर व शंकर या तिघांनी त्यास बोअरच्या विद्युत मोटारीच्या प्लस्टिक पाईपने बेदमपणे मारहाण करून जखमी अवस्थेत मनोहर यास संबधीत महिलेच्या घरासमोर आणून टाकत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले. त्या महिलेने मनोहर याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उठत नसल्याने घाबरलेल्या महिलेने रात्री ११ वाजता मनोहरची पत्नी, मुलांविरुद्ध शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दिली होती. ती परत घराकडे गेली असता मनोहर हा तिच्या दारात दिसून आला नाही. दुसऱ्या दिवशी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनोहरची पत्नी व मुले ही रिक्षातून मनोहरला झोपलेल्या अवस्थेत घेऊन जाताना दिसून आले. त्यांनतर दुपारी ३ वाजता मनोहरच्या पत्नीने त्या महिलेस घरी बोलावून घेऊन मनोहर उठला नसून जेवण केले नसल्याचे व वायबसे यांच्या दवाखान्यात दाखवून आणल्याचे सांगून तूच आता या पुढे त्यांचे काय करायचे ते बघ असे म्हणल्याने ती महिला आपल्या घरी निघून आली. त्याच दिवशी रात्री ८ वाजता मनोहर यास त्याच्या मुलांनी आणून महिलेच्या दारात टाकले. तर रात्री १० वाजता त्याचा मोठा मुलगा कृष्णा याने महिलेस डॉक्टरने दिलेल्या गोळ्या खाऊ घाला असे म्हणाला. मात्र तिने माझा काही संबंध नसल्याचे सांगून नकार दिल्याने त्याने गोळ्या खाऊ घालून निघून गेला. थोड्या वेळात मनोहर हा कसातरी करीत असल्याचे पाहून तिने त्यांच्या घरी जाऊन ही मुलांना माहिती दिली. मात्र त्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्यास नकार दिल्याने शेवटी बबलू साखरे व शैलेश बप्पा या दोघांना गाडी घेऊन बोलावून घेत मनोहर यास केजच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास अंबाजोगाई येथे घेवुन जाण्यास सांगितले. त्यावरून त्यांना २१ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात पोहचले. तेथील डॉक्टरांनी मनोहर यास तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. अशी तक्रार त्या महिलेने दिल्यावरून मयत मनोहरची मुले कृष्णा गायके, ईश्वर गायके, शंकर गायके या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार आनंद शिंदे हे करीत आहेत. तिन्ही मुलांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.