जाळपोळ करणाऱ्या आरोपींकडून ११ कोटी रुपये वसूल करणार.
रोखठोक न्युज वार्ताहर
मराठा आरक्षणावरून जिल्ह्यात जाळपोळ, दगडफेक झाली. यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिस पंचनाम्यातून उघड झाले. आणखीही काही ठिकाणचा पंचनामा सुरू असून, आकडा आणखी वाढणार असल्याचे आले; परंतु ही सर्व रक्कम अटक केलेल्या आरोपींकडून वसूल केली जाणार आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठविणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
मराठा आरक्षणावरून सोमवारी जिल्ह्यात जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. यात नेत्यांची घरे पेटविण्यासह त्यांची कार्यालयेही जाळली. शिवाय हॉटेलही जाळले. यामध्ये जवळपास ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच माजलगाव व बीड शहरांतही इतर छोट्या मोठ्या दुकानांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. अनेक वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात जिल्ह्यात आतापर्यंत ६५ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण १४४ आरोपींना अटक केली आहे. अजूनही आरोपींची ओळख पटवून धरपकड सुरूच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनांमध्ये आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ही सर्व रक्कम पकडलेल्या आरोपींकडून वसूल केली जाणार आहे. जे लोक नकार देतील, अशांची मालमत्ता जप्त केली जाईल.
प्रस्ताव कधी देणार?
• अजूनही गुन्हे दाखल करणे व आरोपी पकडण्याची कारवाई गतीने सुरू आहे. तसेच नुकसानीचे पंचनामेही केले जात आहेत.
आतापर्यंत नुकसानीचा आकडा ११ कोटी झाला असला तरी अजूनही व्यापारी, लोक तक्रार देण्यासाठी येणे सुरूच आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो.
■ या सर्वांचा पंचनामा करून दोषारोपपत्र दाखल होताच शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यानंतर या आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल केली जाणार आहे.
आतापर्यंत नुकसानीचा आकडा ११ कोटी झाला आहे. अजूनही लोक तक्रार देण्यासाठी येतच आहे. या आणखी वाढू शकतो. तसेच आतापर्यंत ६५ गुन्हे दाखल झाले असून १४४ आरोपी ताब्यात घेतले आहेत. ज्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी तक्रार देण्यासाठी ठाण्यात यावे.