ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौका मुळे सत्ता भेटली,कमीत कमी तो तरी चांगला करा.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंधाराचे साम्राज्य,नगरपंचायतचे दुर्लक्ष.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पथदिव्याचे फोकस बंद पडले असताना याकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अंधारातून नागरिकांना वावरावे लागत आहे. चौकात राहिलेल्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे त्याठिकाणी खड्डे पडले असून अंधारातून खड्डे निदर्शनास येत नसल्याने वाहनांची पंचाईत होत आहे.
केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शहराचे महत्वाचे ठिकाण असून या भागातून मोठी वर्दळ असते. हा चौक शहराचे वैभव असून रस्त्याच्या कामापासून या चौकाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. या चौकात उभ्या असलेल्या मोठ्या खांबावरील बहुतांश फोकस बंद पडले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नगरपंचायतीकडून या पथदिव्याची दुरुस्ती केली जाईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने रात्रीच्या वेळी या चौकात अपघाताचा धोका वाढला आहे. याच चौकात रस्त्यावर मोठ्या स्वरुपाचे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे आणि अंधाराचा अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यातुन उडणारा धुराळा वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यात जात आहे. या चौकात ही मोठी समस्या झालेली आहे.
शहरातून गेलेल्या अहमदनगर – अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. नव्याने पोल उभारणी करून पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र पथदिवे आणखी कार्यन्वित केले नसल्याने मुख्य रस्त्यावर ही अंधार असून नागरिकांसह महिलांना अंधारातून वावरावे लागत असून रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल घेऊन शहरातील पथदिवे कार्यान्वित करून अंधार दूर करावा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पथदिवे सुरू करून उर्वरित रस्त्याचे काम करण्यात यावे. यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी मागणी शहरातील नागरिकांसह महिलांमधून होत आहे.