अगोदर पालकांविरोधात केली तक्रार; आता त्यांची नजर चुकवून ठोकली धूम.
केज तालुक्यातील प्रकार : पाणी आणण्यासाठी चालले म्हणून अल्पवयीन मुलगी गायब
रोखठोक न्युज वार्ताहर
सात ते आठ महिन्यांपूर्वी माझा बालविवाह लावत असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांविरोधात बालविवाह प्रतिबंधक केंद्राकडे केली होती. त्यानंतर, ही मुलगी आईसह आजोळी आजी- आजोबांकडे राहायला गेली. गुरुवारी पाणी आणायला जाते, म्हणून घराबाहेर पडल्यानंतर तिने तिकडूनच धूम ठोकली. हा प्रकार तिच्या भावाने पाहिला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड तालुक्यातील येथील एका १७ वर्षांच्या मुलीने पालक बालविवाह लावत असल्याची तक्रार आठ महिन्यांपूर्वी समितीकडे केली होती. त्यानंतर, तिचा हा विवाह थांबला, परंतु असा काहीही प्रकार नव्हता, असा दावा या मुलीच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर ही मुलगी आपला भाऊ व आईसह आजोळी केज तालुक्यात गेली होती. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गावातीलच हापशावरून पाणी आणते असे म्हणत, ती घराबाहेर पडली. पाठोपाठ तिचा भाऊही गेला. यावेळी ती कोठेही दिसली नाही. इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर ती एका मुलासोबत दुचाकीवरून जाताना दिसली. त्यानंतर, मुलीच्या आईने केज पोलिस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली, तसेच एका मुलावर संशय असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.