बेरोजगारांना काम, शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणे हीच माझी लायकी
शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांचा पलटवार
रोखठोक न्युज वार्ताहर
केज /बीड :-मी एका सामान्य, गरीब कुटुंबातील शेतकरी पुत्र आहे. सामान्य जनता माझ्या सोबत असल्याने विरोधक माझी लायकी काय ? अशी माझ्यावर व्यक्तिशः टीका करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या उसाला मराठवाड्यात सर्वात जास्त भाव देत बेकार तरुणांच्या हाताला काम देणे ही माझी लायकी आहे. असा पलटवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी भेटीगाठीवर भर दिला आहे. मतदार जनतेकडून त्यांचे गावोगावी स्वागत होत असून सामान्य जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पाहून विरोधकांकडून वैयक्तिक टीका केली जात असून त्यांची लायकी काढत केलेल्या टिकेवर बजरंग सोनवणे यांनी पलटवार करीत उत्तर दिले. त्यांनी टिकेला उत्तर देताना सांगितले की, येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून दिला. त्यातून तरुण स्वतःच्या पायावर उभी राहिली. सामान्य कुटुंबाची चूल पेटविणे ही माझी लायकी आहे. तर आपल्या कारखान्यात परिसरात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या उसाला मराठवाड्यातील साखर कारखान्याच्या तुलनेत या शेतकऱ्याच्या पोराने सर्वाधिक भाव दिला ही आपली लायकी असल्याचे सांगून ज्यांना आपल्या पित्याने कष्टाने उभा केलेला साखर कारखाना नीट चालविता आला नाही. ज्यांनी शेतकरी व कामगारांच्या चुलीत पाणी टाकण्याचे काम केले. त्यांनी स्वतःची लायकी काय हे तपासावे. असा उलट सवाल ही शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
