जिलेटीनचा स्फोट करून चक्क पान टपरी उडवून देण्यात आली.
टपरीचालक जखमी,
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई – विहिरी खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटीनचा स्फोट करून चक्क पान टपरी उडवून देण्यात आल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे सोमवारी (दि.०८) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी चौकात अनेक लोक असतानाही सुदैवाने केवळ टपरीचालक जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून घटनेची कसून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, सदरील टपरीतून अवैध धंदे सुरु होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील बसस्थानक नजीक असलेल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अशोक सुभाष भालेराव याची पान टपरी आहे. अशोक भालेराव हा मुळचा लातूरचा असून मागील १५ वर्षापासून तो जवळगाव येथे वास्तव्यास आहे. अशोकने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने नेहमीप्रमाणे सोमवारी दिवसभर व्यवसाय केला. रात्री ८.३० च्या दरम्यान तो पान टपरीत बसला असता टपरी खाली अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने टपरीखाली असलेले दगड वरचा पत्रा तोडून बाहेर उडाले. सुदैवाने अशोक थोडासा बाजूला बसलेला असल्याने त्याच्या हाताच्या दंडाला घासून हे दगड गेल्याने तो किरकोळ जखमी झाला. या स्फोटात ताप्रीचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज ऐकून चौकात असलेल्या ग्रामस्थांनी टपरीकडे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाले हे पहिले असता ग्रामस्थांना टपरीखाली मोठा खड्डा पडलेला दिसून आला. तसेच पानटपरीच्या पाठीमागून एक वायर टपरीच्या बाजूने रोडच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपमधून धनंजय शिंदे याचे शेतात गेले होते. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने टपरीचे पाठीमागून कोणते तरी स्फोटक लावून त्याचे वायर धनजंय शिंदे याचे शेतात नेऊन तिथे वायरला करंट देऊन स्फोट घडवून आणल्याचे अशोकने फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस दलाच्या सर्व तपास यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपअधीक्षक विजय चोरमले, एलसीबीचे पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांच्यासह श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाच्या पाहणीनंतर हा स्फोट जिलेटीनचा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा अधिक तपास बरदापूर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक प्रमोद यादव हे करीत असून हा स्फोट कोणत्या कारणास्तव घडवून आणला हे तपासाअंती निष्पन्न होणार आहे.
स्फोटामागे व्यावसायिक कि खाजगी कारण?
टपरीआडून अशोक अवैध धंदे चालवत होता आणि त्यातूनच हा प्रकार झाला असावा अशी ग्रामस्थात चर्चा आहे. मात्र, पोलीस घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी कसून चौकशी करत असून अशोकचा पूर्वेतिहास देखील तपासला जात आहे. ही घटना खाजगी कारणातूनही झालेली असे शकते अशी शंका पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
