दारूसाठी घेतला सख्ख्या भावाचा जीव
रोखठोक न्युज वार्ताहर
माजलगावातील खळबळजनक घटना दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या मोठ्या भावास बेदम मारहाण करून लहान भावाने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव शहरातील भागात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी घडली.
गणेश अशोकराव सोळंके (वय ३२, रा. फुलेनगर, माजलगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गणेश, महेश आणि उमेश हे तिघे भाऊ एकत्रपणे फुलेनगर येथे राहतात. गणेश आणि उमेश हे दारू पिण्याच्या सवयीचे आहेत. सोमवारी देखील त्या दोघांनी दारूसाठी आईकडून पैसे घेण्यासाठी आपसात भांडण केले होते. या भांडणात आईच्या बोटाला मार लागला होता. त्यामुळे ते दोघे दारूसाठी आईचे बरेवाईट करतील म्हणून महेशने तिला मंगळवारी सकाळी केजला मावशीकडे पाठवले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उमेशने गणेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यासाठी त्याने गणेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेशच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असे महेशने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून उमेश सोळंके याच्यावर माजलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
