बस मध्ये चढताना सहा तोळे सोने,पावणेदोन लाखांचे दागिने लंपास.
रोखठोक न्युज वार्ताहर
नातेवाईकाचे लग्न लावून लातूरला जाण्यासाठी निघालेल्या महिला बालविकास कार्यालयातील महिलेच्या पर्समधील पावणेदोन लाखांचे दागिने अंबाजोगाई बसस्थानकात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील महिला बालविकास कार्यालयात कार्यरत असलेल्या सीमा सुग्रीव इंगळे (रा. खोरे गल्ली, लातूर) या नातेवाईकच्या लग्नासाठी अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे आल्या होत्या. लग्न आटोपून लातूरला परत जाण्यासाठी त्या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकात आल्या. तिथे तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका महिलेने त्यांच्याजवळ येत तुमच्या गळ्यातील सोने बॅगेत ठेवा, बसस्थानकावर खूप गर्दी आहे असे सांगितले. त्यामुळे सीमा इंगळे यांनी त्यांच्याजवळील सोन्याचे गंठन, नथ, अंगठी, मणीमंगळसूत्र आणि चांदीची चैन असे एकूण पावणेदोन लाख रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिने स्वतःजवळील बॅगेतील डब्ब्यात ठेवले. त्यानंतर लातूरला जाणाऱ्या बसमध्ये चढताना ती महिला त्यांच्या समोरच होती, दुसरी एक स्कार्फ बांधलेली महिला मागे थांबून त्यांना अडथळा निर्माण करत होती. बसमध्ये चढून सीटवर बसल्यानंतर सीम आयंनी बॅग तपासली असता दागिने चोरी गेल्याचे आढळून आले. बसस्थानकावरील सीसीटीव्ही तपासला असता पाठीमागे असणाऱ्या महिलेनेच चोरी करून पळ काढल्याचे दिसून आले. याप्रकरणी सीमा इंगळे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
