नांदूरघाट प्रकरण : दुसऱ्या गटाची तक्रार, संतोष हांगेसह १५८ जणांवर गुन्हा नोंद
पहिल्या गटातील ५ जणांना अटक व पोलिस कोठडी
रोखठोक न्युज वार्ताहर
नांदूरघाट (ता. केज) येथील प्रकरणात दुसऱ्या गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून माजी जिल्हा सदस्य संतोष हांगेसह १५८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून दिलेल्या तक्रारीनुसार, १५ मे रोजी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष शंकर हांगे, जीवन शंकर हांगे, सतीश माधवराव मोराळे, राजाभाऊ विठ्ठल मुंडे (चौघे रा. नांदुरघाट), गोविंद बिक्कड (रा. नाव्होली), सुंदर सांगळे
(रा.शिरुरघाट), प्रदीप सास्क (रा. खाडेवाडी), रामा बाबुराव हांगे (रा. हांगेवाडी) या आठ जणांसह अनोळखी १०० ते १५० लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी का केली या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तर संतोष हांगेने धारदार हत्यार फिरवून फिर्यादीच्या पुतण्यास मारून दुखापत केली. फिर्यादीच्या भावजयीच्या घरात घुसून संतोष हांगे, जीवन हांगे, सतीश मोराळे, राजाभाऊ मुंडे यांनी शिवीगाळ करीत वाईट हेतूने घराबाहेर ओढून तिची साडी फेडली, अशी
तक्रार दिल्यावरून वरील आठ जणांसह १५८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ जणांना पोलिस कोठडी
पोलिसांनी एका गटाचे श्रीकांत जाधव, सागर जाधव, प्रदीप जाधव तर दुसऱ्या गटाचे विक्रम सांगळे, सुंदर सांगळे या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
