भरदिवसा डॉक्टरचे दोन लाख रुपये हिसकावून चोरटे पसार
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई – बँकेतून दोन लाखांची रक्कम काढून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या डॉक्टरची हँडलला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी अंबाजोगाई शहरात घडली.
अधिक माहिती अशी की, शरद बाळासाहेब जगताप (रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) हे पशू चिकित्सक आहेत. गावकडे शेड बांधणे आणि लेब्र्चे पेमेंट करण्यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी अंबाजोगाई पीपल्स बँकेतून २ लाख ५ हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी एका कापडी पिशवीत ठेवली आणि दुचाकीचा हँडलला अडकवून ते शेतगड्यासह घराकडे निघाले. ते सन्मती पतसंस्थेच्या समोर आले असता दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दोन चोरट्यांनी गाडी वळवून समोरून येत त्यांच्या दुचाकीला धक्का दिला आणि हँडलला अडकवलेली पैशाची बॅग घेऊन ते कुत्तर विहीर रोडने पसार झाले. याप्रकरणी शरद जगताप यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
