मस्साजोग येथे तृतीयपंथी नर्तकाची लॉजवर आत्महत्या
रोखठोक न्युज वार्ताहर
केज : तालुक्यातील सारूळ शिवारातील एका कला केंद्रावर काम करणाऱ्या मस्साजोग तृतीयपंथी नर्तकाने शिवारातील महामार्गालगतच्या एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.
अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील ओंकार उर्फ गार्गी बबन ढलपे हा तृतीयपंथी केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ शिवारातील एका कला केंद्रात गायन व नर्तन कलाकार म्हणून काम करत होता. मस्साजोग येथील अजिंक्य हॉटेल आणि लॉजवर शुक्रवारी पहाटे ५ वाजेदरम्यान कर्मचाऱ्यांना लॉजच्या एका खोलीतील पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत गार्गीचा मृतदेह लटकलेला आढळला. लॉजवरील नोकरांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक कादरी, जमादार दत्तात्रय बिक्कड, पोलिस नाईक संतोष गित्ते, मतीन शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
शवविच्छेदनानंतर शुक्रवारी दुपारी नातेवाईक व केज येथील तृतीयपंथींनी क्रांतीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी केज पोलिस अधिक तपास करत आहे.
