धारूरमध्ये प्रवाशांनी केली कंडक्टरला मारहाण : मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
गौतम बचुटे/केज :- रस्त्यात बस थांबविण्यासाठी घंटी वाजवून कंडक्टरला खाली ओढून दोघा पती पत्नीने मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारी वरून मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १५ ऑक्टोबर रोजी धारूर आगाराची धारूर-माजलगाव गाडीचे कंडक्टर शहादेव मंत्री आणि त्यांचे सोबत ड्रायव्हर श्रीकांत ठोंबरे हे सकाळी १०:४५ वा. धारूर बस स्थानकाच्या बाहेर घेवुन जात असताना गाडीत बसलेला प्रवाशी बन्सी रामकिसन चौरे याने बसची बेल वाजविली; म्हणून कंडक्टर मंत्री त्याला म्हणाले, तुम्ही बेल वाजवु नका. मी बस रोडच्या बाजुला थांबवितो. असे म्हणताच बन्सी चौरे याने चालु बसचा दरवाजा उघडला व म्हणाला की, तुम्ही बस थांबावा. त्यामुळे ड्रायव्हर ठोंबरे यांनी तेलगांव रोडवर एस बी आय बँक समोर रोडच्या बाजुला बस थांबविली. बस थांबताच बन्सी चौरे याने कंडक्टर मंत्री यांना बसमधून खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या नंतर त्याची पत्नी संगीता चौरे खाली उतरली आणि तिनेही कंडक्टरचे कपडे फाडुन चप्पलने मारहाण केली. तर बन्सी चौरे यांने उजव्या हाताचा अंगठा धरुन मुरगळाला.
ते दोघे पती-पत्नी भर रस्यात्यातर कंडक्टर मंत्री याला रस्त्यावर मारीत असतानाच्या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असून त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केली आहे.
या प्रकरणी कंडक्टर मंत्री यांच्या तक्रारी वरून बन्सी चौरे व त्याची पत्नी संगीता चौरे या दोघांच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून कर्तव्यावर असलेल्या कंडक्टरला मारहाण केल्या प्रकरणी गु. र. नं. २९९/२०२४ भा. न्या. सं. १३२, १२१(१), ११५(२),३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.
_______
