एपीआय गणेश मुंडे यांची खासदार बजरंग सोनवणे यांनाच धमकी.
मी पत्रकार परिषदे घेतली तर चड्डी सुद्धा रहाणार नाही.

रोखठोक न्युज वार्ताहर
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची वादग्रस्त पोस्ट, खा.सोनवनेंकडून कॉल रिकॉर्डिंग तपासण्याची मागणी
बीड: वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप’वर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामुळे पोलीस दलात वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’ अशी पोस्ट मुंडे यांनी केली. यामुळे पोलीस दलात पोलीस आहेत की गुंड अशी चर्चा सुरू झाली असून खा.बजरंग सोनवणे यांनी सदरील पोलीस अधिकाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. या हत्येचा तपास आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु झालेला आहे. या हत्येच्या पाठीशी जे राजकीय लोक आहेत, त्यांच्याबद्दल जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील सपोनि.गणेश मुंडे आणि सपोनि.दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे.
खासदार सोनवणे यांच्या मागणीनंतर बीड पोलीस खळबळ उडाली आहे. दहिफळे आणि मुंडे या दोघांबद्दलही सर्वसामान्यासोबतही पोलीस दलात देखील फारसे चांगले बोलले जात नाही. त्यातच सपोनि.गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हाटस्अप ग्रुपवर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामध्ये म्हटले होते की, ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’. असे म्हटले आहे. या पोस्टवर काही पत्रकारांनी विचारपूस केल्यानंतर सदरील पोस्ट मुंडे यांनी डिलिट केली, आणि स्थागुशाचे पो.नि.उस्मान शेख यांनी मुंडे यांना गु्रपमधून काढून टाकले.अशा वाचाळ आणि धमकी देणार्या पोलीस अधिकार्यावर एसपी नवनीत कांवत काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
