चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून; केज शहरात खळबळ
रोखठोक न्युज वार्ताहर
केज : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच केज शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाचा दुसऱ्या अल्पवयीन मुलाकडून निर्घृण खून करण्यात आला आहे. रेहान कुरेशी असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे केज शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेहान कुरेशी याचे आणि त्याच्या शेजारी चिकन विक्री करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलामधील वाद विकोपाला गेला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आदळले. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे केजमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
