• Thu. Jun 25th, 2026

मद्यधुंद कंटेनर चालकाने 20 जनाना चिरडल, एक महिला ठार, १९ जण जखमी

Bybaba maske

May 16, 2025

मद्यधुंद कंटेनर चालकाने 20 जनाना चिरडल,

एक महिला ठार, १९ जण जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – कंटनेरच्या मद्यधुंद चालकाने कंटनेर भरधाव वेगात चालवून चार वाहनांसह पदचाऱ्यांना पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर १९ जण जखमी झाले आहेत. ही थरारक घटना केज शहरात शुक्रवारी दुपारी घडली. जखमींवर केज आणि अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कंटनेर हा ३० किमी अंतरावर जाऊन लोखंडीसावरगाव (ता. अंबाजोगाई) येथे पलटी झाला. पाठीमागून पाठलाग करीत गेलेल्या जमावाने चालकाला चोप देत कंटनेर पेटवून दिला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अग्निशमन दलाने कंटनेरची आग विझवली.

एका कंटनेरच्या चालकाने अतिमद्य प्राशन करीत नशेत कंटनेर (डी. डी.०१ झेड. ९७७१) चालवीत शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मांजरसुंबाकडून केज शहराच्या दिशेने आला. शहरापासून जवळ असलेल्या वडार वस्तीजवळ बीडहुन केजकडे येत असलेले युसुफवडगाव ठाण्याचे जमादार सिद्धार्थ शिंदे हे रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत उभे असताना त्यांना कंटनेरची धडक दिली. तसाच कंटनेर शिक्षक कॉलनीच्या पुढे रस्त्याने चालत असलेल्या टमटमला (एम. एच. २३ एच. ५४५) धडक जोराची दिली. यामध्ये टमटममधील अनेक प्रवासी जखमी झाले. पुढे कंटनेरने चाटे हॉस्पिटलसमोर आणि शासकीय विश्रामगृहासमोर दोन दुचाकीला धडक देत आला. मुख्य रस्त्यावरील जुन्या पोलीस ठाण्यासमोर रस्त्याने चालत असलेल्या मीना प्रवीण घोडके (वय ३७, रा. चिंचोलीमाळी ता. केज) यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तसाच पुढे पदचाऱ्यांना धडक देत धारूर चौकात अंबाजोगाई रस्त्याने जात असलेले मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल बाबुराव कुलकर्णी यांच्या कारला (एम. एच. २३ एएस ०८९७) धडक देत कंटनेर पुढे अंबाजोगाईच्या दिशेने जात असताना चंदनसावरगाव येथे दुचाकीवरील दाम्पत्याला धडक देत कंटनेर पुढे वेगात निघून गेला. शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश बनसोडे, वाहतूक पोलीस शाखेचे सिद्दीक शहा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कंटनेर चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंटनेरच्या वेगामुळे पोलिसांना काही करता आले नाही.

या अपघातात पोलीस कर्मचारी सिद्धार्थ शिंदे (वय ५२, रा. युसुफवडगाव), कृष्णा हरिदास कापरे, (वय २०, रा. कापरेवाडी ता. केज), श्रद्धा मधुकर चिंचकर (वय १८, रा. येवता), सुनील सुंदर घुले (वय ५९, रा. केळगाव), बळीराम आप्पाराव पांचाळ (वय ४०, ढाकेफळ), सोनू बाबु शेख (वय २०, रा. केज), विकास वसुदेव काकडे (वय २२, रा. कापरेवाडी) कुमार गायकवाड (वय ५५, रा. देवगाव), शेषेराव मारुती चंदनशिवे (वय ५५, शिरपुरा), सरिता रावसाहेब मुंडे (वय ५७), रावसाहेब यादवराव मुंडे (आशालता मुंडे (वय ५०, तिघे रा. चारदरी), फुलाबाई धोंडीराम सावंत (वय ६०, रा. सुगाव ता. अंबाजोगाई), विद्या विलासराव सूर्यवंशी (वय ३०), विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी (वय ४०, दोघे रा. पिसेगाव),

सिद्धेश्वर वसुदेव कापरे (वय २२, युसुफवडगाव), बाबासाहेब देशमुख (वय ५८, रा. बोरीसावरगाव) व त्यांची पत्नी हे १९ जण जखमी झाले. जखमींवर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईकडे पाठविण्यात आले. केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस नाईक शमीन पाशा शेख, त्रिंबक सोपणे यांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

कंटनेर पलटी, चालकास चोप

लोखंडीसावरगाव (ता. अंबाजोगाई) पासून जवळच असलेल्या कळंब – केज जाणाऱ्या चौकाजवळ भरधाव कंटनेर पलटी झाला. याचवेळी कंटनेरचा पाठलाग करीत गेलेल्या जमावाने कंटनेर चालकास पकडून चांगला चोप दिला असून कंटनेर पेटवून दिला. अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले. तर अग्निशमन दलास पाचारण करीत कंटनेरची आग विझवली.

 

<

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!