जलजीवन मिशनमध्ये ३२ कोटींचा घोटाळा?
भाजपचा मोठा मासा अडकणार!
मंत्री पंकजाताई मुंडे यांचा विश्वासू कार्यकर्ता.
रोखठोक न्युज वार्ताहर
‘हर घर जल’ या घोषणेसह सुरु झालेली जलजीवन मिशन योजना सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली दिसते. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांची तहान भागवण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही योजना केज तालुक्यात मात्र गैरव्यवस्थापन आणि भ्रष्ट कारभाराचे जिवंत उदाहरण बनली आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी, बेलगाव, जाधव जवळा, आरणगाव, टाकळी, डोनगाव, कदमवाडी, शिरपूरा आदी गावांमध्ये जलजीवन योजनेतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगली आहे. अंदाजे ३२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.
बेलगाव येथे बोगस कामं – भाजप कार्यकर्त्याची चौकशी होणार?
बेलगाव येथील नागरिकांनी आरोप केला आहे की, जलजीवन योजनेचे काम अतिशय बोगस पद्धतीने पार पाडले गेले. संबंधित गुत्तेदार आणि भाजपच्या एका युवा नेत्याने योजनेतील निधी हडप केला आहे. हा युवा नेता पंचायत समितीच्या माजी सदस्यांचा पती असून तो मंत्री पंकजाताई मुंडे यांचा विश्वासू कार्यकर्ता असल्याची जोरदार चर्चा आहे.
तो ‘आपल्यावर कोणीही हात टाकू शकत नाही’ अशा आविर्भावात वावरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पाणीटंचाई आणि पशुधन संकट
या भागातील विहिरी, तलाव कोरडे पडले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
