परळीतील मिरवणुकीत कोंबड्याचा बळी
राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षाविरुद्ध गुन्हा
रोखठोक न्युज/प्रतिनिधी
परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्याविरुद्ध मिरवणुकीमध्ये कोंबडा कापल्याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये परळी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी रानबा ढगे यांनी देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
परळी शहरात सप्तशृंगी देवीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त टॉवर ते गणेशपार भागात मिरवणूक काढण्यात आली. टॉवरजवळ दीपक देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी हळद-कुंकू, नागवेलीची पाने, कोंबडे व लिंबू कापले. हा अघोरी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुकेशिनी गायकवाड, विकास वाघमारे, प्रा. दासू वाघमारे, रानबा गायकवाड आदी कार्यकर्तेही तेव्हा उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला असून, त्यानुसार देशमुखांविरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत नमूद केले आहे.
