चक्क पाझर तलावात खदाण आणि खडीक्रेशर !
केज तालुक्यातील केकत सारणी शिवारात पाझर तलावातून बेसुमार अवैध गौणखनिज उपसा
तक्रारदार रमाकांत धायगुडे यांच्या तक्रारीनंतर घटनास्थळी पंचनाम्यात मुरूमाचे ढिग आढळून आले, आता प्रशासन कारवाई काय करणार ?
रोखठोक न्यूज /प्रतिनिधी
पाझर तलावातून अवैध गौणखनिज उपसा करून चक्क त्या तलावाला खदाणीचे स्वरूप आले आहे. तसेच तलाव परिसरातच एकाने खडीक्रेशर सुरू केल्याने या खडीक्रेशरला परवानगी कोणी दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून केज तालुक्यातील केकतसारणी शिवारात तलावातून अवैध गौणखनिज बेसुमार उपसा झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी समाजसेवक रमाकांत धायगुडे यांनी तक्रार देवून याप्रकरणी कारवाईची मागणी केल्यानंतर त्याठिकाणी संबंधित मंडळाधिकारी यांनी पंचनामा केला असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून आता केज प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे तलावात खदाण असल्याचे दिसून आले.त्याशिवाय एक खडीक्रे शरही त्याठिकाणी सुरू असल्याचे पंचनाम्यातून समजून आले.विशेष म्हणजे ज्याठिकाणी हे तलाव आहे आणि खडीक्रेशर सुरू आहे त्या जमिनीच्या सातबारावर महाराष्ट्र शासन नाव असल्याने सदरील खदाण आणि खडीक्रेशर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत असून तलावात अक्षरशः ४० ते ५० फुटाचे खड्डे अवैध गौणखनिज उपसा करून झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे तलावात मुरूमाचे ढिगही आढळून आले असून एकंदरीत त्या पाझर तलावातून बेसुमार उपसा झाल्याचे दिसून येत असून प्रशासनाने संबंधितांवर गंभीर कारवाई – करण्याची गरज आहे.
•चौकट
ग्रामस्थ आणि पाळीवप्राण्यांचे जीव धोक्यात !
पाझर तलावातून गौणखनिज उपसा करायचा असेल तर संबंधित विभागातून परवानगी घेणे गरजेजे आहे.तसेच राज्यमहामार्गाचे काम असेल तरच संबंधित विभाग तलावातून गौणखनिज उपसा करण्याची परवानगी देते. परंतु संबंधितांनी कोणतीही परवानगी नसताना तलावातून बेसुमार गौणखनिज अवैध उपसा केला. त्यातून तलावात ४० ते ५० फुटाचे खड्डे झाले.या खड्ड्यांमुळे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पाळीवप्राण्यांचे व इतर प्राण्यांचे जीव धोक्यात आले असून यातून ग्रामस्थांचीही मोठी जीवित हानी होवू शकते.यासाठी प्रशासनाने अवैध मुरूम उपसा करणाऱ्या व खडीक्रेशरखवाल्यावर गंभीर कारवाई करण्याची गरज असून विशेष म्हणजे मंडळाधिकारी यांनी याप्रकरणी स्पष्ट पंचनामा करून सर्व बाबी नमुद केलेल्या आहेत. त्या दृष्टीकोनातून प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
