• Mon. Oct 6th, 2025

लक्ष्मण हाकेंची निकटवर्तीय पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला; 40 जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गंभीर जखमी

Bybaba maske

Sep 24, 2025

लक्ष्मण हाकेंची निकटवर्तीय पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला; 40 जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण, गंभीर जखमी

रोखठोक न्यूज वार्ताहर 

 बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या इतर साथीदारांनाही दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

आरक्षण प्रश्नावरून मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघालं असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन करवर यांच्यावर मंगळवारी रात्री सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे इतर तीन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यात काही आठवड्यांपूर्वी जेव्हा लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा पवन करवर हे हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याच करवर यांच्यावर हल्ला झाल्याने हाके यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पवन करवर आणि त्यांचे साथीदार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळील एका धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. दरम्यान, अचानकपणे 40 ते 50 अज्ञात युवक धाब्यावर पोहोचले आणि हातातील काठ्या, दांडके तसेच लाथाबुक्क्यांच्या सहाय्याने करवर यांच्यासह चौघांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही क्षण धाबा परिसरात एकच गोंधळ उडाला.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पवन करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तिघा साथीदारांनाही मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालक कोळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलवले असून, हल्ला करणारे सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!