डाॅक्टरला एमडी साठी प्रवेश देतो म्हणून ८ लाखाला फसवले.
केजचे डिवायएसपी रामानंद यांची कारवाई.
रोखठोक न्यूज वार्ताहर
एमडीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने धारुर तालुक्यातील येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी या आरोपीला केज येथील साहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने कराड येथे मंगळवारी पहाटे ४ वाजता ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना जेरबंद केले आहे.
धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील रहिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे हे बारामती येथे कार्यरत आहेत. फेसबुकवर त्यांची नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. सौरभ याने डॉ. तोंडे यांना मॅनेजमेंट कोठ्यातून एमडी मेडिसिनसाठी प्रवेश मिळवून देतो, म्हणून लाख रुपये ३ वर्षाची फीस सांगितली. त्यानंतर, केवळ ६५ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देतो, म्हणून नगदी रोख आणि फोन पेद्वारे एकूण ८ लाख रुपये घेतले होते; परंतु पहिल्या यादीत डॉ. तोंडे यांचेकोणत्याच यादीत नाव आले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता, मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते करून घे, म्हणून सांगितले होते. त्यानंतर, धारुर पोलिसात सौरभ कुलकर्णी याच्या विरोधात ९ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंद झाला होता.
या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांनी करून सौरभ हा बेंगलोर येथून कराडमार्गे पुण्याला जात असल्याची माहिती मिळविली आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता कराड जि. सातारा येथील ट्रॅव्हल्सची झडती घेत, सौरभ कुलकर्णी याला पथकाने जेरबंद करून रात्री ७वाजता केजला आणले. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम, पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर व आमिर इनामदार, जमादार अनिल मंदे यांच्या पथकाने केली.
३ कोटी ८६ लाखांची फसवणूक केल्याचे पंजाब, गुजरातमध्ये १५ गुन्हे नोंद
आरोपी सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) याच्याविरुद्ध वाडा नाशिक शहर, टेंभुर्णी सोलापूर ग्रामीण, चंदजिरा, घनसांगवी जालना, धंतोली नागपूर, खडकी पुणे, दहिसर मुंबई, विजापूर नाका सोलापूर, अमृतसर पंजाब, जरी फटका नागपूर, तासगाव सांगली, हुडकेश्वर नागपूर, देसासिटी बनास फाटा गुजरात व धारुर बीड अशा १५ पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले असून, फसवणुकीच्या रकमेचा आकडा ३ कोटी ८६ कोटी रुपयांपर्यंत आहे
